पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरला ११ अद्यावत बेडची भेट

भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा घट्ट बसत असून ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.


कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर तसेच परिचारिका रात्रंदिवस सेवा पुरवत असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधा कमी पडत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटरला ११ अद्यावत बेड ची भेट देण्यात आली.
अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने संपूर्ण लॉकडाऊन च्या काळात शहरातील गरीब मजूर व हातावर पोट भरणाऱ्या ७०० पेक्षा जास्त कुटुंबाना किराणा व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भूक भागविण्याचे काम केले. सामाजिक बांधिलकी जपत असताना शहरातील गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचे काम प्रतिष्ठान कायमच करत आले आहे. शहराचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते वंचित घटकांच्या मदतीला नेहमी धावून जातात. प्रतिष्ठानने या महामारीच्या काळात शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. शहरातील प्रभागात प्रतिष्ठानच्या वतीने जंतुनाशक फवारणीचे काम नित्यनियमाने सुरु असून आरोग्यविषयक जनजागृतीबरोबरच थर्मामिटर तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अर्षेनिक अल्बम  गोळ्यांचे वाटप प्रभागात करण्यात आले. डॉक्टर व परिचारिकांच्या मदतीने प्रभागात आरोग्यतपासणी मोहीम हाती घेण्यात आली. अभय आव्हाड प्रतिष्ठान तसेच बाबूजी आव्हाड महाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या वतीने पंतप्रधान साहाय्यता व मुख्यमंत्री साहाय्यता निधीस दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली. 
कोव्हीड सेंटरला देण्यात आलेल्या बेड भेटप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बबन चौरे, खजिनदार दादासाहेब वाघ व संजय बडे आदींची उपस्थिती होती.