अंजनगाव नगर पालिका कोंडवाडा दुरुस्तीसाठी उदासीन का?


अंजनगाव सुर्जी नगर पालिका कार्यक्षेत्रांत कोंडवाडा अस्तित्वात नसून दरमहा कोंडवाड्यावर नियुक्त कर्मचाऱ्यास वेतन मात्र  दिल्या जाते. त्याच प्रमाणे शासनाने आदेशित केलेल्या प्रपत्र ४४ मध्ये अंजनगाव शहरास नगरपालिका पुरवीत असणाऱ्या मूलभूत सुविधा मध्ये शहरात कोंडवाडा असल्याचा उल्लेख आहे. मात्र त्या कोंडवाड्याची हालत इतकी खराब व दैनीय झाली आहे की त्या कोंडवाड्यात एक पशु देखील ठेवणे अशक्य आहे. काही दिवसापूर्वी पांढरी येथून जाणाऱ्या पाच संशयित बैलांना पोलिसांनी अटकाव केला होता. त्या बैलांना रात्री ठेवण्यासाठी नगर पालिकेमध्ये फोन लावला असता नगर पालिकेत कोंडवाडा अस्तित्वात नसल्याचे सांगितल्या गेले. ज्या मुळे ते पशुधन रात्रभर उर्दू शाळा क्र. ५ मध्ये ठेवल्या गेले. ज्या पशुधनाची चारा व पाण्याची व्यवस्था शहरातील पशुप्रेमी गजानन हुरपडे यांनी केली. जर शहरात कोंडवाडा उपलब्ध नाही तर त्या कोंडवाड्यावर कर्मचारी नियुक्त कसा? ज्या कर्मचाऱ्यास महिन्या काठी वेतन दीले जाते. नगर पालिकेचे गावातील मुक्या व अबोल प्राण्यां बाबत उदासीनता का? कोंडवाडा शहरात असणे अत्यावश्यक असून शहरास पुरविल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेत तसा उल्लेख केल्या गेला आहे. मग नगर पालिका कोंडवाडा का निर्माण करीत नाही. शहरातील मुख्यरस्त्यावर अनेक पाळीव प्राणी बसलेले असतात. ज्यामुळे अपघात होऊ शकतात मात्र फक्त वरच्या मिळकतीवर डोळा ठेवणाऱ्या न. प. अधिकाऱ्यांचे ह्या अतिआवश्यक सेवेवर लक्ष नसून शहरात ह्यामुळे मोठी घटना घडणार असल्याचे दीसत आहे. ज्यामुळे वरिष्ठांनी ह्यावर लक्ष केंद्रित करावे.